(नवी दिल्ली)
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ऑस्टिन यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. सोमवारी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी संरक्षण प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. बदलत्या जागतिक परिस्थितीबाबत संरक्षण संबंधित मुद्द्यांवर ही चर्चा करण्यात आली. संरक्षण, स्वच्छ इंधन तसेच अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्याचा निर्धार भारत-अमेरिका यांनी केला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लाॅईड ऑस्टिन यांची भेट घेत चर्चा केली.
लॉयड ऑस्टिन यांची ही भेट पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या १५ दिवस आधी होत आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष होते. ऑस्टिन यांनी अलीकडेच जपान, सिंगापूर, फ्रान्स आणि भारत दौर्याची घोषणा केली होती. त्यानुसार ऑस्टिन हे भारत दौऱ्यावर आले असून, दोन्ही देशांसोबत औद्योगिक भागीदारी वाढवणाऱ्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. जानेवारी २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ऑस्टिन यांची ही दुसरी भारत भेट आहे. यावेळी अनेक नवीन संरक्षण सहकार्य प्रकल्पांवर राजनाथ सिंह यांची ऑस्टिन यांच्यासोबत चर्चा झाली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत देशातच जास्तीत जास्त संरक्षण साहित्याची निर्मिती करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाची देशाला गरज आहे. सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्याची खरेदी करतो. मुक्त आणि सुरक्षित भारत-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका सध्या जगभरात लॉबिंग करीत आहे. चीनपासूनचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. या मुद्यावरही सिंग आणि ऑस्टिन यांच्या दरम्यान चर्चा झाली. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी मजबूत होईल, असे ऑस्टिन यांच्या भारत भेटीसंदर्भात बोलेल जाते. तसेच इंडो-पॅसिफिक आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.