(गुहागर)
तालुक्यातील हेदवी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. चिपळूण सत्र न्यायालयाने या संशयिताचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
ही पीडित मुलगी तिच्या आई- वडिलांसोबत हेदवी गावी राहत आहे. अमोल चव्हाण नावाच्या तरुणाने तिच्याशी जवळीक वाढवून तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले होते. तिच्या अज्ञानाचा व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. नातेवाइकांच्या ही बाब लक्षात आल्यावर महाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा गुहागर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. गुहागर पोलिसांनी अमोल चव्हाण याला १३ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक केली होती. याप्रकरणी चिपळूण सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी काम पाहिले.